नमस्ते मुद्रा: अर्थ, उद्देश, स्वरूप आणि योगसाधनेशी संबंध

युनायटेड किंगडमचे तत्कालीन राजकुमार (आणि आताचे राजे) चार्ल्स नमस्ते करताना

समोरासमोर एखाद्याला अभिवादन करताना त्या व्यक्तीसमोर आपले शरीर झुकवणे किंवा किंचित वाकणे हे जगामधील अनेक देशांमध्ये आणि संस्कृतींमध्ये जवळजवळ सामान्य आहे. अशा पद्धतीच्या अभिवादनाचा केवळ एकच उद्देश आहे कि निदान काही क्षणासाठी तरी आपली समोरच्या व्यक्तीला दिसणारी उंची कमी करून त्या व्यक्तीबद्दल आदर व्यक्त करणे. काही धर्मांमध्ये आणि संस्कृतींमध्ये तर दोन्ही गुढगे जमिनीवर टेकवून आणि पुढे झुकून किंवा सरळ लोटांगण घालून (अति)आदर व्यक्त करण्याची पद्धत आहे.

हस्तांदोलन (शेकहँड) करणे ह्याच्या एकदम विरुद्ध नमस्ते करताना दोन व्यक्तींमध्ये शारीरिक संपर्क टाळून आदर दाखवला जातो. अशा प्रकारच्या अभिवादनामुळे विषाणू संसर्ग पसरला जात नाही. कोविड-१९ (कोरोना) विषाणू साथीच्या काळात अनेक विदेशी नेते, पुढारी आणि राजकारणी मंडळी ह्यांनी केवळ ह्याच एका कारणासाठी नमस्ते मुद्रा जवळपास सर्व जगात प्रसिद्ध बनवली. खरं तर सार्वजनिक आरोग्य सुरक्षेला चालना देण्यासाठी हे एक अगदी जाणीवपूर्वक उचललेले पाऊल होते.

भारतीय वंशाचे आयर्लंडचे माजी पंतप्रधान लिओ वराडकर
अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प ह्यांना नमस्ते मुद्रा शिकवताना

एखाद्या व्यक्तीला नमस्ते करणे हे नेमका काय संदेश देते ? नमस्ते करणे हे नेमके धार्मिक स्वरूपाचे आहे की आध्यात्मिक ? नमस्ते करतेवेळी ज्या पद्धतीने दोन हात समोर धरले जातात त्याचा आणि योगाभ्यासादरम्यान त्याचपद्धतीने धरल्या जाणाऱ्या हातांचा एकच अर्थ आणि उद्देश्य आहे का ? चला तर मग, या प्रश्नांची एकमागे एक उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करूया.

१) नमस्ते मुद्रेचा उद्देश: सगळ्यात आधी आपण ' नमस्ते ' म्हणजे नेमके काय ते समजून घेऊया. हा संस्कृत शब्द दोन शब्दांपासून बनलेला आहे - ' नमः ' ( उच्चार ' नमह् ' ) आणि ' ते '. ' नमः ' ह्या शब्दाचा अर्थ किंवा ' झुकणे ', 'लवणे ' किंवा ' नमन करणे ' आणि ' ते ' म्हणजे ' तू ' किंवा ' तुम्ही '. म्हणून आदर व्यक्त करण्यासाठी ' नमस्ते ' ह्या शब्दाचा सरळ अर्थ " (मी) तुला/तुम्हाला नमन करत आहे " किंवा " (मी) तुला/तुम्हाला नमन करतो / करते " असा आहे. खरं पाहिलं तर ' नमस्ते ' तोंडाने उच्चारणे बंधनकारक नाही कारण हि मुद्राच शब्दापेक्षा अधिक आदर व्यक्त करते.

नमस्ते मुद्रा तेव्हाच पूर्ण झाली असे मानले जाते जेव्हा एक व्यक्ती तिच्या दोन्ही हातांचे उघडे तळवे एकमेकांवर ठेवते, तशाच अस्वस्थेत हातांना छाती, चेहरा किंवा कपाळासमोर धरते आणि मान वाकवते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नमस्ते मुद्रेत उभे असलेल्या किंवा बसलेल्या व्यक्तीच्या दोन्ही हातांची सर्व बोटे त्या एक (किंवा अनेक) व्यक्तीकडे रोखून धरली पाहिजेत ज्या व्यक्तीसाठी आदर व्यक्त केला जात आहे.

२) नमस्ते मुद्रेचे स्वरूप: ध्यानधारणा, योग/योगाभ्यास आणि शास्त्रीय नृत्यांच्या संदर्भात ' मुद्रा ' या शब्दाचा अर्थ " एक सांकेतिक किंवा विधीवत शारीरिक हावभाव, आसन किंवा ढब " असा होतो. काही मुद्रांमध्ये फक्त हात आणि/किंवा हातांची बोटे वापरली जातात. मुळातच दोन्ही हातांचे उघडे तळवे एकमेकांवर धरणे आणि त्यांना समोर ठेवणे याला प्राचीन भारतीय परंपरेत अंजली मुद्रा असे म्हणतात. ' अंजली ' शब्दाचा अर्थ " अर्पण करणे " किंवा " श्रद्धा व्यक्त करणे " असा आहे. अंजली मुद्रेचे वर्णन प्राचीन भारतीय हस्तलिखित ग्रंथामध्ये केले गेले आहे. त्यापैकी काही ग्रंथ इसवी सन २०० वर्षांपूर्वीचे आहेत.

इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी जी७ शिखरपरिषदेवेळी
जर्मनीचे राष्ट्रप्रमुख ओलाफ शोल्झ ह्यांना नमस्ते करताना

भारतीय उपखंड, दक्षिण आशिया आणि आशियाच्या इतर भागांमध्ये कित्येक शतकांपासून नमस्ते मुद्रा ही अभिवादन म्हणून मोठ्या प्रमाणावर वापरली जात असल्यामुळे नमस्ते मुद्रेचा शोध कोणत्याही एका विशिष्ट धर्माने लावला नाही किंवा तिचे कारण कोणत्याही एका विशिष्ट धर्मात दडलेले नाही. मुळातच ' नमस्ते ' या शब्दाचा सविस्तर अर्थ " तुझ्यात/तुमच्यात असलेल्या दिव्यत्वाला मी नमन करतो / करते " असा होतो. त्यामुळे एकमेकांमधील दिव्यत्वाला ओळखणे आणि त्याबद्दल आदर व्यक्त करणे ही एक अतिशय उच्चस्तरीय विधी आहे. नमस्ते मुद्रा ही पूर्णपणे आध्यात्मिक स्वरूपाची आहे.

प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये खोलवर जाऊन पहिले तर अंजली मुद्रेला ' हृदयांजली मुद्रा ' म्हणून ओळखले जाते जी " हृदयाबद्दल अत्यादर " आणि ' आत्मांजली मुद्रा ' म्हणून देखील ओळखले जाते जी " आत्म्याबद्दल अत्यादर " व्यक्त करते. कदाचित आशिया खंडामधील इतर प्राचीन भाषेतील ग्रंथांमध्ये ह्या मुद्रेचा असाच अर्थ असेल.

३) योगसाधनेशी संबंध: नमस्ते मुद्रा आणि योगसाधनेमध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी आणि तशीच दिसणारी मुद्रा ह्या दोन्हीमध्ये थोडा फरक आहे. काही योगासनांमध्ये योग साधक स्वतःच्या छातीकडे ( किंवा हृदयाकडे ) संकेत करताना दोन्ही हातांचे अंगठे इतर चार बोटांच्या काटकोनात (९० अंशात) धरून ठेवतात. म्हणून योगसाधनेच्या संदर्भात ही थोडी वेगळी मुद्रा किंवा बोटांची स्थिती पूर्णपणे वेगळी स्थिती आहे. (ह्याबद्दल आपण अगदी पहिल्यांदाच वाचत असाल कारण ह्या फरकाबद्दल फार बोलले जातच नाही.)

A) नमस्ते मुद्रा आणि B) योगसाधनेच्या मुद्रेतील अंगठ्याची स्थिती

नमस्ते मुद्रेच्या आदर व्यक्त करण्याच्या उद्देशाच्या विरुद्ध दुसरी मुद्रा (B) ही काही योगासनांमध्ये एका अतिशय वेगळ्या उद्देशाने वापरली जाते. हि विशिष्ट मुद्रा किंवा अंगठ्याची स्थिती ही योगाभ्यास करताना अतिशय फायदेशीर मानली जाते. तिच्या अनेक फायद्यांपैकी एक मुख्य फायदा म्हणजे मानसिक तणाव आणि चिंता दूर करण्यात मदत होते. म्हणूनच चित्त एकाग्र करण्यासाठी आणि ध्यानाच्या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी ती हेतुपुरस्सर किंवा जाणीवपूर्वक वापरतात.

[#विशेष माहिती: भारतातील १,५०० वर्षांहून अधिक जुन्या योग परंपरेप्रमाणेच इजिप्तमध्ये देखील एक स्वतंत्र योग परंपरा आहे. तिला केमेटिक योग (Kemetic Yoga) असे म्हणतात जिला असर हापी (Asar Hapi) आणि यर्सर रा होटेप (Yerser Ra Hotep) ह्या योग अभ्यासकांनी १९७०च्या दशकात विकसित केली. त्या दोघांनी प्राचीन इजिप्तच्या चित्रलिपीमध्ये दाखवलेल्या वेगवेगळ्या मुद्रांमधून प्रेरणा घेऊन केमेटिक योग विकसित केला.]

Comments