कृत्रिम बुद्धिमतेचे अदृश्य सामाजिक संकट

तीन महिन्यांपूर्वी, खूप दिवसांनी मी माझ्या एका मित्राच्या घरी गेलो होतो. आम्ही या आधी दोन वेळा समोरासमोर भेटलो होतो पण आम्हा दोघांसाठी हि भेट एक अतिशय मार्मिक संवाद ठरणार होता. त्याच्या घरी आम्ही खूप वेळ चर्चा केली आणि आम्ही आपापले अनुभव एकमेकांना सांगितले. आम्ही एकत्र जेवलो, हसलो आणि खिदळलो. त्याच्या घरातून निघण्यापूर्वी आम्ही एकमेकांना हस्तांदोलन केले (हातात हात मिळवले) आणि एक घट्ट मिठी मारली. मी त्याचे घर सोडले ते माझ्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य आणि अंतःकरणात गहिरे समाधान घेऊनच !

आमच्या संभाषणादरम्यान, माझा तो मित्र असं काही बोलून गेला की ज्याची मला अजिबात अपेक्षा नव्हती. जरी तो उच्चशिक्षित नसला तरी मला माहित आहे की तो खूप वाचतो. तो म्हणाला, "समोरासमोर संवाद साधणे हा एक संप्रेरक बदलणारा अनुभव आहे." खरंच, समोरासमोरचा संवाद त्यात सहभागी असलेल्या व्यक्तींच्या शरीरातील संप्रेरक बदलण्यास सक्षम आहे. त्त्याच्या त्या डोळे उघडणाऱ्या वाक्यानेच मला हा लेख लिहायला खूप प्रेरणा दिली आहे. आपल्यातील बऱ्याच जणांनी ह्याविषयी वाचले असेल पण ह्या लेखामध्ये मी जे मांडणार आहे ते तुम्ही कदाचित अगदी पहिल्यांदाच वाचणार आहात.

आपल्यापैकी आजकाल बरेच जण संपूर्ण दिवसभर आपला व्यवसाय, उदरनिर्वाह, उद्योगधंदा आणि कामांमध्ये खूपच व्यस्त असताना. त्यामुळे समोरासमोर संवादाची वारंवारता आणि कालावधी कमी झाला आहे. आता आपला बहुतेक परस्परसंवाद इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होतो म्हणजेच फोन करून मारलेल्या गप्पा, संदेश टाईप करून मारलेल्या गप्पा, व्हिडिओ कॉल किंवा ई-मेल. सामाजिक प्राणी असल्याने आपण आधीच खूप काही गमावत आहोत आणि भविष्यात इलेक्ट्रॉनिक संवाद आपले अधिक नुकसान करू शकतो. पण नेमकं कसं ? समजावतो.

समोरासमोर राहून देवाणघेवाण करणं हे माणसाच्या संवादाची मूळ पद्धत आहे. समोरासमोर राहून संवाद हा एकमेकांच्या शब्दांची देवाणघेवाण किंवा त्यांना ऐकण्यापलीकडे जातो. संवादामध्ये तोंडाने उच्चारलेला शब्द असोत किंवा नसोत पण आपण अगदी नकळतपणे अशाब्दिक (चेहऱ्यावरचे हावभाव, शारीरिक हावभाव, बोलण्यातील सूर आणि हातवारे) संकेतांची व्यापक स्तरावर देवाणघेवाण करत असतो. मागील लाखो वर्षांमध्ये काही मर्यादांचा सामना करत असतानाही आपण ह्याच पद्धतीने एकमेकांशी समोरासमोर संवाद साधला आहे.

" या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात, तुम्ही ज्या व्यक्तीसोबत समोरासमोर संवाद साधत आहात त्याची देहबोली वाचणं हेच फक्त महत्वाचे नाही तर ज्या व्यक्तीशी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने संवाद साधत आहात तो व्यक्ती एक खराखुरा किंवा जिवंत व्यक्ती आहे ह्याची खात्री करणे हे देखील महत्वाचे आहे..."

इलेक्ट्रॉनिक संवादाने आपल्याला वेळ आणि भौगोलिक अंतरामधील प्रचंड दरी पार करायला निश्चितपणे मदत केली आहे. तरीदेखील, इलेक्ट्रॉनिक संवाद हा मानवी परस्परसंवादात एक प्रचंड अशाब्दिक दरी निर्माण करतो. खास करून, संदेश टाईप करून मारलेल्या गप्पांमुळे समोरासमोरील संवाद, व्हिडिओ कॉल किंवा फोन करून मारलेल्या गप्पा यांच्या दरम्यान होऊ मिळणारे समृद्ध अशाब्दिक संकेत पूर्णपणे नष्ट करून टाकले आहेत. हा कसला भयानक दरिद्रीपणा आहे ना !

व्हिडिओ कॉल आपल्याला एकमेकांना पाहण्याची सोय जरी देत असला तरी आपण जसे समोरासमोर संवाद साधताना एकमेकांना स्पर्श करू शकतो तसा स्पर्श व्हिडिओ कॉल करताना करू शकत नाही. तसेच, आपण जास्तीत जास्त समोरच्या व्यक्तीचा चेहरा आणि शरीराचा वरचा भागच पाहू शकतो. ते सोडलं तर इलेक्ट्रॉनिक संवादावेळी बरेच जैविक, भौतिक, शारीरिक आणि अशाब्दिक संकेत उपलब्ध असत नाही. उदाहरणार्थ, आपण एकमेकांच्या शरीराचा वास घेऊ शकत नाही.

आपल्यापैकी बरेच जण व्हिडिओ कॉल, फोन करून मारलेल्या गप्पा, संदेश टाईप करून मारलेल्या गप्पा आणि ई-मेल लिहिण्यात जास्तीतजास्त गुंतले गेल्यामुळे हे अगदी स्पष्टपणे दिसून येते की आपल्यापैकी बरेच जण नियमित आणि सामान्यपणे होणाऱ्या समोरासमोरील संवादामधील विविध प्रकारचे अशाब्दिक संकेत ओळखण्याची आणि अचूकपणे वाचण्याची एक नैसर्गिक क्षमता (आणि कला) झपाट्याने गमावत आहेत. अगदी नकळतपणे आपण एका मोठ्या संकटाकडे सरकत आहोत.

आज जगभरातील सर्व वयोगटांतील लोकांचे वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खाते (Account) असणे आता खूप सामान्य आहे (त्यात व्हाट्सअप देखील आलेच !). एकाच वेळी हजारो किंवा लाखो लोकांशी जोडले जाण्याची आणि संवाद साधण्याची गरज पूर्ण करण्यासाठी आपल्या स्मार्टफोनवर अनेक ऍप्लिकेशन्स (ऍप्स) उपलब्ध आहेत. आज आपण हजार मैल दूर राहणाऱ्या एखाद्या व्यक्तीशी अगदी समोरासमोर गप्पा मारतो तशा गप्पा मारू शकतो.

काळाची एक गरज की केवळ व्यसन ?

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणालीच्या झपाट्याने होणाऱ्या विकासामुळे, आपण कदाचित परस्परसंवादाच्या एका पूर्वी कधीच कल्पना न केलेल्या एका अशा टप्प्यात प्रवेश करत आहोत ज्यामध्ये वास्तवाला भ्रमापासून वेगळे करणे कठीण किंवा अशक्य होऊ शकेल. आधीच आपल्यापैकी बहुतेक लोकांची अकल्पनीय प्रमाणातील खाजगी माहिती विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. त्यामुळं आपण आपल्या वैयक्तिक माहितीच्या आधारे बनवल्या जाणाऱ्या डीपफेक (Deepfake), गहिऱ्याखोट्या किंवा बिनचूक नक्कल केलेल्या प्रतिमा आणि व्हिडिओमुळे होणाऱ्या मोठ्या सामाजिक नुकसानाला आमंत्रण देत आहोत.

विशाल भाषिक प्रतिकृती (Large Language Models) आणि कृत्रिम बुद्धिमतेच्या चॅटबॉट्समुळे, तुम्ही ज्याच्याशी काही दिवस खाजगीरित्या संदेश टाईप करून गप्पा मारत आहात तो व्यक्ती एक खराखुरा माणूस आहे की नाही जाणून घेणे नजीकच्या भविष्यात अतिशय कठीण किंवा अगदी अशक्य होईल. कृत्रिम बुद्धिमतेचा चॅटबॉट तुम्ही एकाद्या खऱ्या व्यक्तीला अनेक वर्षांपासून चांगल्या प्रकारे ओळखता त्या व्यक्तीची बोलण्याची पद्धत आणि वाक्यरचना यांची उत्तम प्रकारे नक्कल करेल अशी दाट शक्यता आहे. अशा अकल्पनीय पातळीची नक्कल हि एक फसवा, मन वळवणारा आणि व्यक्तीला भडकावणारा प्रभाव आहे.

एखाद्या व्यक्तीची बिनचूक नक्कल करून फसवणे, पटवणे आणि मन वळवणे हे आधीच अनेक कारणांनी फाटत चाललेल्या समाजसाठी अत्यंत धोकादायक आहे. ह्याची सर्वात वाईट बाजू अशी आहे की आपण अशा आभासी किंवा गहिऱ्याखोट्या व्यक्तीला त्याने केलेल्या गुन्ह्याबद्दल किंवा किंवा आपल्याला गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त केल्याबद्दल पकडू आणि शिक्षा करू शकत नाही. त्यामुळे अशा गहिऱ्याखोट्या किंवा आभासी व्यक्तीमुळे आपले किती नुकसान होऊ शकते याची आपण कल्पना करू शकत नाही.

" समोरासमोर संवादांमध्ये पूर्वीपेक्षा जास्त वेळ घालवून आज आपल्याला आपले कुटुंब, मित्र, सहकारी, शेजारी आणि समुदाय यांच्यासोबत अतिशय मजबूत सामाजिक संबंध निर्माण करणे आवश्यक आहे. "

अनेक संशोधक आणि तज्ञ कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालींना आपल्या विरोधात काम करण्यापासून रोख घालण्याचा प्रयत्न करत आहेत. पण कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालींच्या बेफाम वाढीकडे पाहता त्यांना खरंच नियंत्रणात आणले जाऊ शकते हे आत्तापर्यंत १०० % निश्चित नाही. दुसरीकडे, डीपफेक, गहिऱ्याखोट्या किंवा बिनचूक नक्कलेद्वारे कैक लोकांची फसवणूक करणे, त्यांना भडकवणे आणि त्यांचे मन वळवणे यासाठी काही समाजविघातक व्यक्तीकडून वापर करण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही.

खासकरून, जर एखादा/एखादी व्यक्ती स्वतःला समाजाकडून वंचित, नापसंत, ऐकला न गेलेला/ली किंवा कमी लेखला गेलेला/ली आहे असे समजत असेल तर अशी व्यक्ती अगदी सहजपणे समाजविरोधी गुन्हे किंवा कामं करण्याच्या मोहाला बळी पडण्याची दाट शक्यता आहे. एकदा विश्वास संपादन केल्यानंतर, त्या व्यक्तीला समाजाविरुद्ध काहीही करण्यासाठी एक अत्यंत चलाख आभासी, डीपफेक किंवा गहिऱ्याखोट्या व्यक्तीद्वारे सहजपणे भडकवले जाऊ शकते, चुकीची माहिती दिली जाऊ शकते किंवा त्याचे मन वळवले जाऊ शकते.

कदाचित, या सामाजिकदृष्ट्या आव्हानात्मक युगाची हीच गरज आहे की आपण कोणत्याही गंभीर गरजेशिवाय इलेक्ट्रॉनिक संवाद टाळून आणि नियमित समोरासमोर संवाद, चर्चा किंवा संभाषणांमध्ये शक्य तितका अधिक वेळ घालवावा. ह्यामुळे निश्चितपणे आपल्याला खरेखुरे सामाजिक लाभ परत मिळायला लागतील आणि तसेच लोकांना वाचण्याची क्षमता देखील परत मिळेल ज्याची आपल्यापैकी बहुतेक लोकांच्याकडे वर्षानुवर्षे कमतरता झाली आहे.

(नकळतपणे किंवा जाणीवपूर्वक) समोरासमोरच्या संवादादरम्यान निरनिराळ्या अशाब्दिक संकेतांची देवाणघेवाण करताना आणि ते वाचताना, अभिवादन/नमस्कार करणे, स्मितहास्य करणे, मोट्ठ्याने हसणे, स्पर्श करणे, हातवारे करणे, डोळ्यात डोळे घालून पाहणे, देहबोलीची नकळतपणे नक्कल करणे, सोबत बसणे/उभे राहणे आणि एकमेकांना प्रतिसाद देणे या सर्व गोष्टींचे आपल्या मेंदू आणि मनावर खोल परिणाम होतात. निर्विवादपणे, हे इलेक्ट्रॉनिक संवादाद्वारे साध्य करता येत नाही.

तुम्ही एका आभासी व्यक्तीशी संवाद साधत आहात का ?

या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात, तुम्ही ज्या व्यक्तीसोबत समोरासमोर संवाद साधत आहात त्याची देहबोली वाचणं हेच फक्त महत्वाचे नाही तर ज्या व्यक्तीशी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने संवाद साधत आहात तो व्यक्ती एक खराखुरा किंवा जिवंत व्यक्ती आहे ह्याची खात्री करणे हे देखील महत्वाचे आहे. कारण एखाद्या डीपफेक, गहिऱ्याखोट्या किंवा अस्तित्वात नसलेल्या व्यक्तीला आपण त्याने केलेल्या हानीकारक फसवणुकीसाठी किंवा मन वळवल्यासाठी पकडू शकत नाही, त्याला प्रश्न करू शकत नाही आणि/किंवा शिक्षा करू शकत नाही.

समोरासमोर संवादांमध्ये पूर्वीपेक्षा जास्त वेळ घालवून आज आपल्याला आपले कुटुंब, मित्र, सहकारी, शेजारी आणि समुदाय यांच्यासोबत अतिशय मजबूत सामाजिक संबंध निर्माण करणे आवश्यक आहे. आपण ते करून दाखवणार करणार आहोत का ? जरी कृत्रिम बुद्धिमत्तेने आपल्याला गुलाम बनवले आणि/किंवा नष्ट केले नाही तरी देखील हा मोठा प्रश्न कायमच आपल्यासमोर उभा राहील.

घट्ट, रचनात्मक, सहानुभूतीपूर्ण आणि गहिरेखरे (DeepReal) संबंध निर्माण करून संभाव्य नुकसानकारक गहिरेखोटे (DeepFake) संबंध मोठ्या प्रमाणात टाळले जाऊ शकतात.

[#धोक्याचा इशारा: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या प्रभावाखाली, केवळ खऱ्या किंवा जिवंत लोकांशीच चर्चा किंवा संभाषण करून लोकशाही टिकण्याची हमी दिली जाऊ शकते.]

Comments